पुणे २४ तास:- मुंढवा येथील शासकीय जमिनी खरेदीचा झालेला व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया एंटरप्रायझेस कंपनी दाखविली असली, तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. या व्यवहाराचा दस्त रद्द (कॅन्सल डिड) करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे अशा दोघांना समक्ष हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी या प्रकरणातील शीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंढवा येथील शासनाच्या मालकीची ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसने तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. हा व्यवहार ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील व कुमखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यामध्ये झाला आहे. या खरेदीखतावेळी (दस्त नोंदणी) या कंपनीने जागेवर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेण्यात आली. तर दुय्यम निबंधकांनी देखील दस्तांवरील पाच टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याऐवजी सात टक्के शुल्क माफी दिली आहे. शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हा व्यवहार घेता करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी शासकीय जमिनींचा अपहार झाल्यामुळे शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हे खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय कंपनीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीच्या लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनही चौकशी केली होती. परंतु हा दस्त रद्द करण्यासाठी कॅन्सल डिड करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या दोघांमध्ये हा व्यवहार झाला आहे. त्या दोघांनाही हजर राहून तो रद्द करावा लागणार आहे. तसेच त्यापोटी ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहेत. परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे कॅन्सल डिड करण्यासाठी तेजवानी यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी त्या हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























