पुणे २४तास ः- महिला सक्षमीकरणाच्या घोषणांवर पाणी फेरणारा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. एका नवनिर्वाचित महिला नगरसेविकेच्या पतीने थेट महापालिकेच्या स्वच्छता आढावा बैठकीत हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचा प्रकार समोर आला असून, नगरसेविका केवळ नामधारी आणि प्रत्यक्ष कारभार पतींच्याच हाती असल्याची चर्चा रंगली आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देत राजकारणात समान संधी देण्याचा दावा केला जातो. त्यानुसार शहरातील महापालिकेत ८८ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. मात्र, यातील काही नगरसेविकांनी अद्याप महापालिकेची पायरीही चढलेली नसताना त्यांच्या पतींकडून थेट कारभारात हस्तक्षेप सुरू झाल्याने या आरक्षणाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित नवनिर्वाचित नगरसेविकेचा सत्कार आयोजित केला होता. त्यानंतर स्वच्छतेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत नगरसेविका संपूर्णवेळ शांत बसून राहिल्या. यावेळी त्यांच्या पतींनीच पुढाकार घेत स्वच्छतेच्या कामकाजावरून अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. तसेच, ‘या भागातील स्वच्छतेची माहिती मला रोज द्या,’ असा थेट आदेशही त्यांनी दिला.
या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार की नाही, की सत्तेच्या आडून पतीच कारभार चालवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. महिला आरक्षणाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होणार की नाही, यावरही या घटनेमुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























