महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा
पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. अशा वेळी मन मोकळे करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेने ‘संवाद हेल्पलाईन’ सुरू केली आहे. विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सेवा २४ तास, सातही दिवस उपलब्ध असून, १४४९९ या टोल फ्री क्रमांकावर मोफत मदत व समुपदेशन मिळू शकते.
गेल्या काही महिन्यांत या हेल्पलाईनच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून मदत करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. सध्या दररोज किमान २०० ते २५० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत.
बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा, शैक्षणिक दबाव, करिअरविषयक चिंता, नातेसंबंधांतील गुंतागुंत, एकाकीपणा आणि व्यसनाधीनता यांसारख्या कारणांमुळे मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून येते. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात ताणाचा अधिक सामना करावा लागतो. अपेक्षांचे ओझे, अपयशाची भीती आणि भविष्याविषयीची चिंता यामुळे काही विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज भासते.
अनेकदा मनातील भावना कुटुंबीय, मित्र किंवा शिक्षकांसमोर व्यक्त करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ‘संवाद हेल्पलाईन’ हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडता येतात. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची माहिती आणि तिच्याशी झालेला संवाद गोपनीय ठेवण्याची व्यवस्था असून, गरजेनुसार मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
रात्र असो वा दिवस; मदत एका फोनवर!
मानसिक ताण निर्माण होण्यासाठी ठरावीक वेळ नसते. रात्रीच्या वेळी, सुट्टीच्या दिवशी किंवा परीक्षेच्या काळातही तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ‘संवाद’ हेल्पलाईन चोवीस तास सुरू ठेवण्यात आली आहे. चिंता, नैराश्य, एकाकीपणा, नातेसंबंधांतील तणाव किंवा इतर मानसिक अडचणी जाणवत असल्यास नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी म्हणजे कमकुवतपणा नव्हे. वेळेत मदत घेणे, मनातील भावना व्यक्त करणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांनी संकोच न करता मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
चौकट | एक फोन… मन मोकळे करण्यासाठी
- हेल्पलाईन क्रमांक : १४४९९
- सेवेची वेळ : २४ तास, सातही दिवस
- कोणासाठी : सर्व नागरिक; विशेषतः विद्यार्थी आणि तरुण
- समस्या : मानसिक ताण, चिंता, नैराश्य, एकाकीपणा, करिअरविषयक चिंता, नातेसंबंधांतील तणाव आणि व्यसनाधीनता.
- वैशिष्ट्य : गोपनीयता राखून समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन.
कोट | संवादातून मिळतो मानसिक आधार
“दिवसेंदिवस विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक तसेच इतर कारणांमुळे ताणाचा सामना करावा लागतो. धावपळीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होणे आणि मानसिक तणाव वाढणे अशा समस्या दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातेच असे नाही. त्यामुळे दूरध्वनीवर समुपदेशनाची सुविधा महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमार्फत विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी ‘संवाद’ हेल्पलाईनद्वारे २४ तास सेवा दिली जात आहे.”
— डॉ. श्रीकांत पवार, सहाय्यक प्राध्यापक, मनोविकृती समाजकार्य विभाग, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















