पुण्याच्या टिंबर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव! 50 ते 60 दुकाने जळून खाक; 27 अग्निशमन वाहने घटनास्थळी
पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (18 नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे 2 वाजून 5 मिनिटांनी जय वल्लभ शाळेजवळील लाकडी साहित्याच्या दुकानांना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील 50 ते 60 दुकानांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुणे अग्निशमन दलाची 24 वाहने, पुणे कॅन्टोन्मेंटचे एक वाहन आणि पीएमआरडीएची दोन वाहने अशा एकूण 27 अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या मोहिमेत सुमारे 150 अग्निशमन जवान आणि अधिकारी सहभागी झाले होते.
टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड, प्लायवूड आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली. आगीच्या झळा जवळील निवासी वस्तीलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अग्निशमन दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग घरांपर्यंत पोहोचू नये यासाठी विशेष प्रयत्न केले.
जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर पुन्हा आग भडकू नये यासाठी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले.
सुदैवाने जीवितहानी नाही
या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र अनेक दुकाने आणि त्यातील लाकडी साहित्य जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुणे 24 तास | आवाज तुमचा, बातमी आमची!

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















