8 ऑगस्ट रोजी पवित्रानम देवालय, गुरुवार पेठ, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात देवनूर यांनी ख्रिश्चन धर्मावर व्याख्यान दिल्याचा आरोप करण्यात आला होता…
पुणे, 12 ऑगस्ट 2026 : खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पास्टर पंकज जेम्स देवनूर यांना पुणे येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध सुभाष गांधी यांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी हा आदेश दिला.
पंकज देवनूर यांच्याविरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 मधील कलम 3(1)(A)(III)(V)(VIII), 9(1), 11(1)(2) तसेच Immigration and Foreigners Act, 2025 मधील कलम 23(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, 8 ऑगस्ट रोजी पवित्रानम देवालय, गुरुवार पेठ, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात देवनूर यांनी ख्रिश्चन धर्मावर व्याख्यान दिल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे आणि कार्यक्रमाची माहिती पाहता हा कार्यक्रम चर्चच्या 141व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचे प्रथमदर्शनी नमूद केले.
न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, कार्यक्रमात इतर धर्मातील व्यक्तींना धर्मांतर करण्याच्या उद्देशाने बोलावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमातील संबंधित कलमांची आवश्यक बाब प्रथमदर्शनी पूर्ण झालेली दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार, अटक झाल्यास पंकज देवनूर यांची ₹1 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि समान रकमेच्या जामिनावर सुटका करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावायची आहे.
याशिवाय, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भारताबाहेर जाता येणार नाही आणि प्रकरणाशी संबंधित व्यक्तींवर दबाव, धमकी किंवा प्रलोभन आणता येणार नाही, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत. मुख्य अर्जावर निर्णय होईपर्यंत हा अंतरिम अटकपूर्व जामीन लागू राहणार आहे.
जामिनासाठी रिपाई ख्रिश्चन आघाडीचा पाठपुरावा
या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) ख्रिश्चन आघाडीचे ख्रिस्तोफर राजमनी यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. गुन्हा दाखल झाल्यापासून ते या प्रकरणावर लक्ष ठेवून असून, संबंधित व्यक्तीला योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पंकज जेम्स देवनूर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठीच्या प्रक्रियेतही राजमनी यांनी पाठपुरावा केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार देवनूर यांना अटक झाल्यास ₹1 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि समान रकमेच्या जामिनावर अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना, प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे ख्रिस्तोफर राजमनी यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















