पुणे जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांसाठी अजित पवारांची जोरदार तयारी; कार्यकर्त्यांशी सल्लामसलत सुरू
पायल पोटभरे – प्रतिनिधी
पुणे 24 तास:– येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुका कोणत्या रणनीतीने लढायच्या आणि संभाव्य युतीबाबत चर्चा झाली.
या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत आहेत. जागा वाटपाची प्रक्रिया सुरू असून काही कार्यकर्ते भाजप–शिवसेना युतीसोबत जाण्याच्या बाजूने आहेत, तर काही स्वतंत्र लढण्याचा विचार मांडत आहेत. अंतिम निर्णय मात्र अजित पवार आणि प्रमुख नेते घेतील.”
ते पुढे म्हणाले, “महायुती म्हणून आपण एकत्र आहोत. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल.”
भाजपविरोधी लढाईबाबत विचारले असता भरणे म्हणाले, “या विषयावर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे निर्णय घेतील.”
पार्थ पवार आणि अंजली दमानिया यांच्याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “या संदर्भात अजित पवारांनी आधीच खुलासा केला आहे, त्यामुळे सध्या त्यावर अधिक बोलणे योग्य नाही.”
शासनाच्या मदतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत केंद्र सरकारला माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून २० हजार कोटी रुपयांचा जीआर जाहीर झाला असून उर्वरित निधी लवकरच वितरित केला जाईल. एनडीआरएफ निधीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत मिळणार आहे.”

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























