पुणे २४तासः- किरकोळ कारणावरून सामान्य नागरिकांना शिवराळ भाषेत झापणारी, नियमांच्या नावाखाली वेठीस धरणारी पोलीस यंत्रणा नेमकी कोणासाठी काम करतेय, हा प्रश्न आता थेट गृहखात्याच्या दारात जाऊन उभा राहिला आहे. पुणे ग्रामीणमध्ये उघडकीस आलेल्या १० कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थ प्रकरणात थेट पोलीस कर्मचाऱ्याचाच सहभाग आढळल्याने ही बाब एखाद्या ‘भ्रष्ट अंमलदाराची चूक’ न राहता गृहखात्याच्या नियंत्रण क्षमतेवरचा आरोप ठरली आहे.
शिरूरमधील गॅरेजचालक शादाब रियाज शेखकडून १८ जानेवारी रोजी जप्त करण्यात आलेल्या अल्प्राझोलमच्या तपासातून अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शामसुंदर गुजर याचा सहभाग उघड झाला. मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात टेम्पोतून जप्त केलेल्या १३ कोटी ७५ लाख रुपयांच्या अल्प्राझोलमपैकी साडेदहा किलो मुद्देमाल गुजरने पदाचा गैरवापर करून परस्पर बाहेर काढून आरोपींमार्फत विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अंमली पदार्थाच्या जागी मैदा भरून ठेवण्यात आल्याने, हा प्रकार किती काळ आणि किती पातळ्यांवर सुरू होता, याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, घरातील गोठे, शेतजमीन व वाहनांमधून १० किलो ७०० ग्रॅम अल्प्राझोलम जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या साठ्याची किंमत दहा कोटी रुपयांहून अधिक आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल चोरीला जात असताना वरिष्ठ अधिकारी, अंतर्गत तपास यंत्रणा आणि गृहखाते नेमके काय करत होते, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
राज्य सरकारकडून ड्रग्जविरोधी मोहिमांचे दावे सातत्याने केले जातात. पण जर पोलीस कोठडीतूनच अंमली पदार्थ बाहेर जात असतील, तर ही मोहीम कागदावरची आहे की प्रत्यक्षात माफियांना कवच देणारी, असा संशय निर्माण होतो. दोषी सापडल्यावर ‘कठोर कारवाई’ची नेहमीची घोषणा पुरेशी नाही; कारण अशी प्रकरणे वारंवार उघड होत असतील, तर ती अपवाद न राहता पद्धत बनल्याचे सूचित करतात.
खरा सवाल असा आहे—
पोलीस यंत्रणेवर गृहखात्याचे नियंत्रण आहे की नाही?
की सामान्य माणसावर धाक दाखवणारी खाकी, माफियांपुढे मात्र गृहखात्याच्याच नकळत झुकते?
या प्रकरणात ‘मोठे मासे’ गळाला लागणार की पुन्हा एकदा सगळे ओझे खालच्या स्तरावर ढकलून प्रकरण मिटवले जाणार, याकडे राज्यातील सजग नागरिक आणि विचारवंतांचे लक्ष लागले आहे. कारण इथे प्रश्न केवळ ड्रग्जचा नाही— तो राज्याच्या गृहव्यवस्थेच्या नैतिक अधःपतनाचा आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























