पुणे परिमंडळ सलग तिसऱ्यादा अववल
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
: महावितरणच्या पुणे परिमंडल लघु प्रशिक्षण केंद्राने सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षीही राज्यातील प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. पुणे परिमंडलातील ६ हजार ८५८ अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गांसह विद्युत अभियांत्रिकीच्या ९ हजार ५०० विद्यार्थांसह १ लाख २६ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी व नागरिकांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महावितरणच्या राज्यभरातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांतून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षांत पुणे लघु प्रशिक्षण केंद्राने तब्बल २८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. त्यानुसार नाशिक येथील महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या मानांकनात पुणे परिमंडलाचे लघु प्रशिक्षण केंद्र सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांवर भर दिला आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक श्री. दत्तात्रेय बनसोडे (नाशिक) यांचेही महत्वाचे सहकार्य मिळाले. लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी गेल्या आर्थिक वर्षात १०५ प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. यात अभियंते, अधिकारी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, अप्रेंटीस, विविध एजन्सीचे कर्मचारी अशा ६ हजार ८५८ जणांना प्रामुख्याने सौर ऊर्जेसह विद्युत सुरक्षा, उपकेंद्र व वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, अॅडव्हान्स मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखण्याच्या उपाययोजना, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, वीजबिलांचे अचूक बिलींग आदींवर प्रशिक्षण देण्यात आले.
यासोबतच महावितरण व पुण्यातील ३३ विद्युत अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात ज्ञानाचे आदानप्रदान अंतर्गत सामंजस्य करार झाले आहेत. या विद्युत अभियांत्रिकीच्या ९ हजार ५०० विद्यार्थांशी थेट संवाद साधून वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, वीजसुरक्षा व डिजिटल ग्राहकसेवा आदींबाबत ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येत आहे. तसेच घरगुती व सार्वजनिक वीजसुरक्षा, डिजिटल ग्राहकसेवा, वीजबचत आदींबाबत शहरी व ग्रामीण भागात मेळावे, कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गांद्वारे सुमारे १ लाख २६ हजार नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतिमान करण्यासाठी विविध उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. यासह कर्मचारी प्रशिक्षणाची व्याप्ती व वेग वाढवण्यात आला. त्याचा प्रशासकीय गतिमानता व तत्पर ग्राहकसेवेसाठी मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. पुणे परिमंडलाच्या लघु प्रशिक्षण केंद्रांने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम स्थान पटकावले याचे समाधान आहे’.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























