
पर्यावरणीय न्याय परिषदेत डावीकडून प्रा.ज्योतीराम मोरे,डॉ.प्रवीण सप्तर्षी,डॉ.ए.जी.अमरसिंघे,डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ.नदाफ आणि प्रा.संतोष माने
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
‘पर्यावरणाला न्याय म्हणजे मानवतेला न्याय’ :परिषदेतील सूर
इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च संचलित राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय(खेड, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणीय न्याय: दक्षिण आशियातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक समस्या’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय ,आंतरविद्याशाखीय परिषदेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ही परिषद महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, ग्लोबल फाऊंडेशन आणि पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी २०२५ रोजी गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र गांधीस्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, अल-कुद्स युनिव्हर्सिटी, पॅलेस्टाईन येथील प्रा.डॉ.मुनथेर मोहद इब्राहिम,महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद व पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण सप्तर्षी,श्रीलंकेतील केलोनिया युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.ए.जी.अमरसिंघे,गोव्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा.डॉ.एफ.एम.नदाफ,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन,प्रा.संतोष माने,प्रा.डॉ.सुनील पाचर्णे,प्रा.ज्योतीराम मोरे,उपप्राचार्य धर्मेंद्र साळवे उपस्थित होते.
पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंके, आयआयटी (मुंबई)चे डॉ. हेमंत बेलसरे,डॉ.संभाजी शिंदे,डॉ.सागर माळी,डॉ.विनायक धुळप,डॉ.अशोक दिवेकर आदीनी विविध सत्रात मार्गदर्शन केले.’पर्यावरण हे एका देशाची मालकी किंवा जबाबदारी नसते,तर सर्व देशांची जबाबदारी असते.पर्यावरणाला न्याय देणे म्हणजे मानवतेला न्याय देणे होय,’असा सूर या परिषदेत उमटला.जेसिका मयूर,अबोली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
ही परिषद सकाळी १० वाजता सुरू झाली. परिषदेत नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि भारतातील तरुण संशोधकांचे सुमारे १५० संशोधन निबंध तीन समांतर सत्रांमध्ये सादर केले गेले. ही परिषद सर्वसामान्य जनतेसाठी खुली होती.परिषदेचा उद्देश शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेला एकत्र आणून पर्यावरणीय न्यायाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा व विचारमंथन करणे हा होता.जागतिक राजकीय व्यवस्था, राष्ट्रीय आर्थिक रचना आणि संपत्तीचे केंद्रीकरण यामुळे निर्माण होणाऱ्या विषमतेचे परिणाम समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे आणि पर्यावरणीय न्यायाच्या माध्यमातून समाजाचे कल्याण साधणे हे या परिषदेचे मुख्य ध्येय होते.
डॉ.अमरसिंघे म्हणाले,’ गांधीजींच्या विचाराने पर्यावरणीय न्याय गाठणे शक्य होणार आहे.पर्यावरण हे एका देशाची मालकी किंवा जबाबदारी नसते,तर सर्व देशांची जबाबदारी असते. नैसर्गिक साधनसंपत्तीची काळजी घेतली पाहिजे’. प्रा. डॉ.एफ.एम.नदाफ म्हणाले,’शाश्वत विकासाचा मार्ग पकडला पाहिजे.श्रीमंत देश, त्यांचे उदयोग विकसनशील देशांवर पर्यावरण नाशाचे दुष्परिणाम लादत आहेत, गरीब देशांना पर्यावरणीय न्याय मिळाला पाहिजे’.डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’पर्यावरणाला न्याय देणे म्हणजे मानवतेला न्याय देणे होय. विकासाबाबत गांधीजींचे विचार अंमलात आणले पाहिजेत.भावी पिढ्यांना पर्यावरण शिल्लक ठेवले पाहिजे’.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले


महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























