पुणे: (पुणे 24 तास ब्युरो )
कर्मचारी भरती करावी, व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, बँक व ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने येत्या सोमवारी (दि. १७ मार्च) सकाळी १० वाजता महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे (महाबँक) मुख्यालय असलेल्या शिवाजीनगर येथील ‘लोकमंगल’ संकुलासमोर देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अखिल भारतीय सरचिटणीस कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी दिली. महाबँकेच्या ५१ झोनल ऑफिसमध्ये कार्यरत ५०० कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात या धरणे आंदोलनात सहभागी होत आहेत. यावेळी संघटनेचे शिष्टमंडळ बँकेच्या वरिष्ठ कार्यपालकाना भेटून मागण्यांचे निवेदन देणार आहेत, असेही ते म्हणाले.
देविदास तुळजापूरकर म्हणाले, “महाबँकेतील कर्मचारी सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी देशव्यापी आंदोलन करत आहेत. बँकेत ७०० शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेच्या ३१८ शाखामध्ये एकही क्लार्क नाही. १२९० शाखामध्ये केवळ एक क्लार्क आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना वेळेनंतर, सुट्टीच्या दिवशी काम करावे लागते. रजा मिळत नाहीत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. ग्राहकसेवेवरही विपरीत परिणाम होत आहे. ग्राहकांची संख्या वाढली, पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने समाधानकारक सेवा देता येत नाही. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचारी भरती करावी, या मागणीसाठी महाबँकेतील कर्मचारी आंदोलन करत आहेत.”
दरम्यान, सोमवारी (दि. १७ मार्च) केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने रिजनल लेबर कमिशनर, व्यवस्थापन आणि संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजिली आहे. या सभेत व्यवस्थापनाने मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर महाबँक कर्मचारी २० मार्चला देशव्यापी संपावर जाणार आहेत. सध्या क्लार्कच्या दोन हजार, शिपायांच्या एक हजार तर सफाई कामगारांच्या २५०० जागा रिक्त आहेत, असे संघटन सचिव शैलेश टिळेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























