पुणे ( पुणे 24तास)
थोर मानवतावादी संत, प्रेरक वक्ते साधू वासवानी यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त साधू वासवानी मिशन यांच्यातर्फे दि. १६ आणि १७ जानेवारी या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमांमध्ये प्रार्थना, सत्संग, प्रभात फेरी, लंगर, मध्यरात्रीचे जागरण यांसह साधू वासवानी, दादा जे. पी. वासवानी यांचे ध्वनिमुद्रित प्रवचन यांसह साधू वासवानी मिशनच्या विद्यमान प्रमुख दीदी कृष्णा कुमारीजी यांचे मार्गदर्शन असे प्रमुख कार्यक्रम पार पडले. साधू वासवानी यांच्या पवित्र स्मृतींना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली.
यामध्ये दि. १६ जानेवारीच्या कार्यक्रमांची सुरुवात पहाटे ५.३० वाजता दीदी कृष्णा कुमारीजी यांच्या नेतृत्वात प्रभातफेरीने झाली. साधू वासवानी यांच्या पवित्र समाधी स्थळापासून ही मिरवणूक निघाली आणि संपली. पुणे कॅम्प परिसरातील रस्त्यांवरून भजन आणि कीर्तनांचे यावेळी आयोजन करण्यात आले. यामध्ये साधकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. यांसह सेंट मीरा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मार्गावर गृहनिर्माण संस्थांनी साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्यप प्रतिमा उभारल्या होत्या. त्या सजवण्यात देखील आल्या होत्या. या प्रतिमासमोर दीदी कृष्णा कुमारीजी यांनी दीप प्रज्वलित केले. या समारोप हवन, सत्संग आणि साधू वासवानीजी यांच्या ध्वनिमुद्रित प्रवचनाने झाला. दरम्यान, साधू वासवानी यांचे निधन झालेली वेळ सकाळी ८.२२ वाजता होती. त्या वेळेला या कार्यक्रमामध्ये स्तब्धता पाळून साधू वासवानी यांचे स्मरण करण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये साधू वासवानी यांच्या कविता आणि गीतांचाप समावेश असलेल्या “नुरी ग्रंथाचे’ पठण करण्यात आले. तर, सायंकाळच्या सत्रात साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांचे रेकॉर्ड केलेले प्रवचन प्रसारित करण्यात आले. “जर तुम्ही इच्छेच्या मार्गावर गेलातय तर तुम्ही कधीही समाधानी होणार नाही,” असे मार्गदर्शन पूज्य दादा वासवानी यांनी प्रवचनाच्या माध्यमातून केले. या दिवसाच्या कार्यक्रमांचा समारोप मध्यरात्री आयोजित करण्यात आलेल्या जागरणाने झाला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात हवन, सत्संग, पवित्र नुरी ग्रंथाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि दीदी कृष्णा कुमारीजी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. साधू वासवानी यांचे जीवनकार्य आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या शिकवणींवर दीदींनी मार्गदर्शन केले. यानंतर गुरू लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या दिवशी साधू वासवानी चौकात दीप यात्रा हा उपक्रमदेखील आयोजित करण्यात आला. या वेळी संतांनी दिलेल्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर दादा जे. पी. वासवानी यांची ध्वनिमुद्रित प्रार्थना आणि साधू वासवानी यांच्या जीवन तसेच शिकवणींवर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या दोन्ही पवित्र दिवशी साधू वासवानी मिशनने व्यापक सेवा उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन कपडे, रेड-लाइट एरियातील महिलांना साड्यांचे वाटप, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्याचे किट देण्यात आले. यांसह साधू वासवानी मिशनच्या जगभरातील केंद्रांनी या निमित्ताने सेवा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले.
साधू वासवानी यांच्याबद्दल अधिक माहिती :
साधू वासवानी हे भारताच्या आधुनिक काळातील दूरदर्शी संत होऊन गेले. त्यांनी सदैव महिला सक्षमीकरण, मूल्यांवर आधारित शिक्षण आणि सर्व धर्मांच्या एकतेबद्दल आग्रही भूमिका मांडत जनजागृती केली. देशाच्या स्वातंत्र्यावेळी सत्याग्रह चळवळीत ते महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी होते. सन १९२९ मध्ये साधू वासवानी यांनी महिलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी दररोजच्या मेळाव्याचे आयोजन केले. या उपक्रमाला “सखी सत्संग’ म्हणून ओळखले जाते. या निमित्ताने महिलांना कौटुंबिक कामकाजातून काही काळ शांतता मिळते. महिलांमध्ये एक मोठी क्षमता- महान शक्ती आहे, जी समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाऊ शकते, हा विचार साधू वासवानी यांनी मांडला. सन १९३३ मध्ये त्यांनी मुलींसाठी मूल्य आधारित शिक्षणावर भर देणारी शाळा सुरू केली, जी “मीरा चळवळ’ म्हणून ओळखली जाते. या चळवळीला आता ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चळवळीच्या माध्यमातून सध्या १६ शाळा आणि महाविद्यालय चालविले जाते आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























