Homeताज्या बातम्यागांधीजींच्या मूलभूत शिक्षण विचारातूनच देशात सकारात्मक बदल घडेल

गांधीजींच्या मूलभूत शिक्षण विचारातूनच देशात सकारात्मक बदल घडेल


‘नई तालीम’च्या संचालिका सुषमा शर्मा यांचे प्रतिपादन

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

महात्मा गांधीजींच्या ‘नई तालीम’चे शिक्षण समानता आणि लोकशाहीच्या स्वरूपात होते. ते एक तत्त्वज्ञान आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत ‘नई तालीम’ अत्याधुनिक आहे. यात शिक्षक मुलांना शेतीतून सर्व शिकवतो. ते आणि आपण यात भेद नाही हे शिकवतो, यातून माणूस बदलण्याची दृष्टी देतो. त्यामुळेच गांधीजींच्या या मूलभूत शिक्षण विचारातूनच समाजात सकारात्मक बदल घडेल, असे प्रतिपादन ‘नई तालीम’च्या संचालिका सुषमा शर्मा यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘गांधीजींची नयी तालीम – आजची शिक्षण व्यवस्था बदलू शकेल का?’ या विषयावर त्या बोलत होत्या. शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक हेरंब कुलकर्णी, प्रयोगशील शिक्षक सचिन देसाई या वेळी उपस्थित होते. मच्छिंद्र गोरडे यांनी सुषमा शर्मा आणि हेरंब कुलकर्णी, तर प्रेम वाघ यांनी सचिन देसाई यांचा या वेळी सत्कार केला.
शर्मा म्हणाल्या, ‘नई तालीम’मध्ये हाताने काम करणाऱ्याला प्रतिष्ठा आहे, शहरी आणि ग्रामीण भागाच्या मूलभूत गरजा वेगळ्या नाहीत, श्रमाकडे आपण प्रतिष्ठा म्हणून पाहत नाही, तर श्रमाचे निर्मितीमूल्य आपण नाकारले. त्यातूनच समाजाशी जोडलेला विचार प्रचलित शिक्षण पद्धतीत समोर येत नाही. मूल शिकते कसे हे औद्योगिक क्रांतीत दुर्लक्षिले गेले. त्याला निसर्ग, मातीपासून दूर करून केवळ पुस्तकी विद्या शिकविली गेली. त्यामुळे ते मूल हाताचा आणि बुद्धीचा वापर करत नाही. शिकूनही ते कौशल्यधारित होत नाहीत. यामध्ये गांधीजींच्या ‘नई तालीम’चे तत्त्व नसल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. शिक्षण चिकित्सक पद्धतीने झाले पाहिजे, हे प्रत्यक्षात यायचे असल्यास त्याची नाळ समाजाशी जोडायला हवी. पालक, समाज म्हणून याची सुरुवात व्हायला हवी. आपण उपभोक्ता असलो, की आनंदी राहू, हेच आपल्याला ज्ञात आहे. त्यातूनच आज पर्यावरण, प्रदूषण या समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून पुढच्या दोन-तीन पिढ्या तरतील, मात्र त्या नंतरच्या पिढ्यांचे काय? पुढील पिढीचा विचार करायचा असल्यास ‘या व्यवस्थेतील न्याय वाटा प्रत्येकाला मिळायला हवा’, हे शिकविणाऱ्या गांधींच्या ‘नई तालीम’ या शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी आवश्यक आहे. ‘संपत्ती आणि अधिकारांचे केंद्रीकरण धोकादायक असून यातून लोकशाहीकडे कसे पाहायचे, हेच आपण विसरलो आहोत. लोकशाहीत सर्वात सधन, आणि गरीब यांना न्याय्य, कायदा समान हवा, असे गांधी मानत. पण आपल्याला मताचा अधिकार असूनही आजचा समाज लोकशाही मानतो का? आपल्याला लोकशाही हवी आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.’
देशातल्या सर्वसामान्य लोकांना जे येते, समजते ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत का नाही? हा आपल्या समोरचा प्रश्न आहे, असे सांगून हेरंब कुलकर्णी म्हणाले, ‘सन १९१५-१६ च्या सुमारास महात्मा गांधी हे भारतात आले, त्याआधी त्यांनी विदेशात शिक्षण पद्धतीत काही प्रयोग केले होते. पण ‘नई तालीम’ ही शिक्षण पद्धती भारतात सुरू करण्यास गांधींना १९३७ साल उजाडले. त्या-त्या परिसरातील उत्पादक काम हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असले पाहिजे, परिसराची त्याला ओळख हवी आणि त्या उत्पादनातून शाळेचा खर्च भागेल, अशी संकल्पना ‘नई तालीम’ची होती. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेतून गांधींची शिक्षणव्यवस्था बाजूला करता येत नाही. मात्र, या शाळा विकसित होऊ शकल्या नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. या शाळांमधून समाजात अहिंसा पाझरली असती. तसे झाले नाही, म्हणून २००२ मध्ये गुजरातमध्ये अमानुष हिंसा झाली आणि आता बीडमध्ये झालेली घटना हे त्याचेच द्योतक आहे. हाताने काम करणाऱ्याला कारागीर म्हटले जाते, तर तोंडाने बडबड करणाऱ्याला प्रोफेशनल म्हणले जाते. नई तालीमची पुनर्रचना करायची असल्यास हाताने काम करणाऱ्याला प्रतिष्ठा द्यावी लागेल, कारण हाताने काम केल्याने मुले लवकर शिकतात, त्यासाठी उपक्रमशील शाळा असणे आवश्यक आहे. देशातील नागरीकरण ५२ टक्के झाले आहे, त्यामुळे या नागरीकरणात मुलांच्या हाती काय उपक्रम देता येतील, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रयोगशील किंवा उपक्रमशील शाळांनी एकत्र आले पाहिजे. अशा शाळांना सरकारने मोठा निधी द्यावा, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) निधी जोडून द्यावा, याकरिता एक दबावगट तयार व्हायला हवा आणि यातून गांधी विचार पोहोचवायला हवा.’ देसाई म्हणाले, ‘शिक्षण हे पुस्तक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापुरते मर्यादित नसून समाजाच्या शेवटच्या घटकाशी संबंधित आहे. त्यामुळे शिक्षणाची परिभाषा बदलण्याची गरज आहे. शिक्षणात सामाजिक व्यवस्थेचा भाग हा महत्त्वाचा असून, पंचक्रोशीतल्या समस्या या देखील शिक्षणातील एक अंग हवे, हे गांधीजींनी ‘नई तालीम’मध्ये मांडले आहे. शाळांमधून पर्जन्यजल पुनर्भरणसारखे प्रयोग होतात का? अशा प्रयोगातून समाज काही शिकू शकेल, तर असे प्रयोग होत नाहीत. त्याचे कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत यांचा समावेशच नाही. यात शिक्षकांचा काही दोष नाही. त्यामुळे प्रचलित शिक्षण व्यवस्थेला समांतर शिक्षण व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. समांतर शिक्षण पद्धतीला स्वीकारताना त्याची पारंपरिक शिक्षण पद्धती होता कामा नये. सामाजिक समस्येचे निराकरण हा समांतर शिक्षण पद्धतीचा गाभा आहे, त्यात विद्यार्थ्यांचा वयोगट निश्चित नाही. ज्या पालकांना मुलांना पारंपरिक शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण द्यायचे नाही, पण असा एकदम प्रवाहाविरुद्धचा निर्णय घेण्यात त्यांना संकोच वाटत आहे, त्यांच्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग हा पर्याय आहे. ही संकल्पना केंद्र सरकारची असून या अंतर्गत प्रत्येक राज्यात मुक्त शाळा सुरू झाल्या आहेत. समांतर शिक्षण पद्धतीचे संघटन व्हायला हवे, तरच शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल होतील.’ धनश्री हेबळीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रेम वाघ यांनी आभार मानले.


विद्रोह केल्याशिवाय भारतीय म्हणून जगता येणार नाही
जात मोठी होते तेव्हा वाईट माणूस नेत्तृत्व म्हणून डोके वर काढतो. असे नेत्तृत्व स्वजातीच्या लोकांनाही प्रतिकार केल्यावर सोडत नाहीत. सध्या जातींनी डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्व जातींत विद्रोही तयार केल्याशिवाय जात जाणार नाही आणि स्व जातीशी विद्रोह केल्याशिवाय भारतीय म्हणून जगता येणार नाही. राज्यघटना बनविताना जुना-नवा जातीयवाद नष्ट करणे, सर्व समाजाला समानतेची मात्रा देणे, सर्वांना समान आणि सन्मानाची वागणूक हे गांधीजींना यांना अभिप्रेत होते आणि तशीच घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेत्तृत्वात तयार झाली. डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात द्वेष, मत्सराची भावना नव्हती, हे आपण सर्वांनी समाजासमोर ठासून सांगितले पाहिजे, असे मत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘गांधी आणि आंबेडकर – आधुनिक भारताचे शिल्पकार’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा.डाॅ. आनंद कुमार, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. ऋषीकेश कांबळे आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे या वेळी उपस्थित होते. आनंदकुमार म्हणाले, ‘अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव यातून गांधी हे भारतीय समाजाचे नायक झाले. गांधी यांनी आपल्या आयुष्यातील झालेल्या चुकांबाबत आणि पत्नी, मुलगा, काँग्रेस पक्ष यांसह खासगी जीवनाबाबत आत्मचरित्रात लिहले आहे. दुसऱ्याने लिहण्याच्या आधी हेच त्यांचे मोठेपण असून यातून गांधी हे पारदर्शकतेचे प्रतीक असल्याचे सिद्ध होते. हयातीत गांधी, आंबेडकर जेवढे महान होते त्यापेक्षा ते त्यांच्या असामान्य योगदानामुळे आता ते महान वाटतात. कांबळे म्हणाले, ‘भारतीय समाज आणि समाजाची मानसिकता गांधी, आंबेडकर या दोघांनाच समजली. सन १९३२ नंतर या दोन महान राष्ट्रपुरूषांनी राष्ट्राच्या उभारणीसाठी काम केले.’ डंबाळे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचा विचार गांधी, आंबेडकर यांच्याशिवाय होऊ शकत नाही. या दोघांत वाद होते, असा समज समाजात आहे. गांधी वगळून आपले नेतृत्व प्रस्थापित करू पाहणारे व्यक्ती, संघटना यांनी जाणीवपूर्वक हा भ्रम पसरविला.’ यावेळी सत्र २ मध्ये तेजस भालेराव यांनी आभार मानले.

  • प्रवीण प्र. वाळिंबे
  • माध्यम समन्वयक
  • ९८२२४५४२३४/७३८७००२०९७.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...
error: Content is protected !!